Skip to content

एम.पी.एस.सी ग्रस्त..!!! पालकांनी व विध्यार्थ्यानी जरूर वाचा, MPSC चे वास्तववादी चित्र.

  • by

मित्रांनो काल परवा MPSC चा निकाल लागला. समाजमाध्यमावर यशस्वी विद्यार्थ्याचे फोटो पाहीले. निवड झालेल्या उमेदवारांसाठी आनंद झाला पण अयशस्वी विद्यार्थ्यासाठी दुःखही झाले.

तुम्हाला माहीत आहे का यावर्षीचा निकाल हा फक्त ०.००११% लागला आहे. ही परीक्षा तब्बल ३,६०,९९० विद्यार्थ्यांनी दिली होती त्यापैकी निव्वळ ४२० जणांची अंतिम यादी मध्ये निवड झाली आहे. तेव्हा या MPSC आजाराची व्याप्तीही कोरोनापेक्षाही भयानक असल्याचे जाणवले. आणि तेव्हाच ठरवले या भयानक आजाराची लागण माझ्यासकट महाराष्ट्रातील अनेकांना झालीय.पण काहींचा त्यापासुन बचाव व्हावा या साठी हा लेखण प्रपंच.

आज महाराष्ट्रातील गावखेड्यापासुन ते शहरा पर्यत बहुतांश पदवीधर मुलांना MPSC या भयानक आजाराची लागण झालीय.महाराष्ट्र भरातील हजारो अभ्यासिकेत लाखो सुशिक्षित युवक मोठमोठ्या ठोकड्या मध्ये रात्रदिवस तोंड खुपसुन बसलेले दिसतील. दिवसाच्या २४ तासामधून १४ ते १५ तास अभ्यासात वेळ देणारे विध्यार्थी सुद्धा आहेत. एक परिक्षा पास झाली म्हणजे चांगली आरामदायी, सुरक्षित, पैसा, पद, प्रतिष्ठा, पाॅवर मिळेल या आशेने महाराष्ट्रातील प्रत्येक पदवीधर युवक एकदा का होईना पण या MPSC आजाराला बळी पडतोच. काही समजूतदार विद्यार्थी यामधून तात्काळ बाहेर येतात, तर इतर स्वतःचे सर्व आयुष्य वाट बघण्यात बरबाद करून टाकतात.

मित्रांनो जसे आपल्याकडे सोशल मिडिया वर ट्रेंड चालतात तसेच काही ट्रेंड काही वर्षांपासून शिक्षणात देखील चालू आहे. ९० च्या दशकात डीएड , बीएड चा ट्रेंड आला होता तो ट्रेंड २००४ आणि २००५ पर्यंत कायम होता मग तेव्हापासून आजपर्यंत इंजिनिअरिंग आणि मेडिकल चा ट्रेंड चालू आहे. या सगळ्या मध्ये एक ट्रेंड मोठाच होत गेला त्या ट्रेंड स्वरूप इतक्या मोठ्या प्रमाणात वाढलं की तो ट्रेंड थांबावने आता अवघड होतय. त्या ट्रेंड च आता कंर्मर्शिलाझेशन मोठ्या प्रमाणात झालाय, त्यात अनेक लोक करोडपती, हिरो झाले आहेत तर अनेक लोक रोडपती, झिरो झाले आहेत.

सध्या स्पर्धा परीक्षांचा ट्रेंड आहे, सध्या बेरोजगारीच्या प्रश्नांमुळे बरेच विध्यार्थी स्पर्धा परीक्षांकडे वळत आहे. दरवर्षी लाखो विद्यार्थी डिग्री घेऊन बाहेर पडत आहे. बऱ्याच जणांचे कॉलेज मधून सिलेक्शन होत, इतरांना नातेसंबंधातून नोकरी मिळते, पण मग उरलेल्या विद्यार्थ्यांचे काय होणार? मग आता पुढे करायच काय ? घरचे आणि नातेवाईक विचारणार काय चाललंय सध्या?

त्याचवेळी सर्वाना पर्याय म्हणून स्पर्धा परीक्षा दिसते. डिग्री झाल्यानंतर अनेक जण ठरवतात की १ ते २ वर्ष आपल्याला स्पर्धा परीक्षेला द्यायचे पण कधी त्याचे ७ ते ८ वर्ष निघून जातात हे त्यालाही कळत नाही पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. वय वाढलेलं असत, इंटरव्हिव ला गेल्यानंतर पहिला प्रश्न विचारल्या जातो डिग्री होऊन एवढे वर्ष झाले पण त्या प्रश्नाला उत्तर नसत आणि मग यातूनच निराशा वाढायला सुरुवात होते, मग तणाव वाढायाला लागतो. घरच्यांना सुद्धा कंटाळून म्हणाव लागत तू तुझ बघ आता. 

या सगळ्याची सुरूवात होते ती मोबाईल पासून. विद्यार्थी गावाकडे असताना मोबाईल वर जिद्द, चिकाटी , मेहनत ,आत्मविश्वास ,संघर्ष , दृढता ,निश्चय असे मोठ मोठे अलंकारीत शब्दाचे दोन,तीन लोकांचे भाषण(स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांचे आयडॉल असलेल्या ) बघतो. आणि ते कसे १० ते १२ वेळेस अपयशी झाले हे डोकयात घेऊन तो त्याचा मोर्चा पुण्याकडे वळवतो. पुण्याकडे का? कारण हे दोन, तीन पण पुण्यातच असतात.
           
घरची परिस्थिती नसताना सुद्धा आपल्या मुलाला पुण्यात शिकायला पाठवतात. कारण सर्व आईवडिलांचे स्वप्न असते की आपला मुलगा यशस्वी होऊन लवकरात लवकर सेटल व्हायला हवा. आई-वडील म्हणता वेळ पडली तर जमीन विकू पण मुलाला अधिकारी करू.  मग पोरग गावाकडून पुण्यात येतो. मग त्याची हॉस्टेल किंवा रूम ची शोधाशोध सुरु होते त्यातच काही मित्रही दोन ते तीन वर्षपासून पुण्यात राहत असतात.

हा विद्यार्थी शहरात पहिल्यांदाच गावाकडून आलेला असतो त्यामुळे हैराण ,परेशान होत असल्यामुळे साहजिकच अनेक मित्र-मैत्रिणी भेटतात मग ग्रुप तयार होतो. मग हळूहळू चहा चे प्लॅन बनायला सुरुवात होते. मग ते भावी अधिकारी त्या चहा पिण्यात यांचे दिवसातले चार ते पाच तास कसे जायाला लागतात हे त्यांना देखील कळत नाही. एम.पी.एस.सी ने किती विद्यार्थ्याना अधिकारी बनवल ते माहीत नाही पण MPSC न विविध क्लासेस चालकांना, अभ्यासिका मालकांना, झेराॅक्सवाले, विविध पुस्तक प्रकाशने, वसतीगृह चालक, मेसवाले एवढच काय तर चहाच्या ठेला लावणार्यांना देखील अति श्रीमंत केल एवढ मात्र नक्की.

तिकडं तोपर्यंत बापानं एक एकर शेत विकलेल असत. असं नाही की पोरग अभ्यास नाही करत, बाहेर शिकणाऱ्या प्रत्येक पोराला वाटत असत की आपण काही तरी केलं पाहिजे, त्यामुळे ते पोरग पण मन लावून अभ्यास करत असत पण मग वर्षानुवर्षे MPSC च्या जागाच निघत नाही आणि जागा निघाल्या तरी १००० च्या वर कधी निघत नाही आणि त्या जागांसाठी लाखोंच्या संख्येने फॉर्म येतात बंर हे सर्व लाखो जण सगळं सारखंच अनुसरण करत असतात त्यामुळे हे १००० सोडले तर बाकीच्यांना पुढच्या वर्षी पर्यंत थांबण्यापेक्षा पर्याय नसतो. पुन्हा तेच चक्र दरवर्षी परत परत. 

यावर्षी निकाल फक्त ०.००११% इतका लागला आहे. ही परीक्षा तब्बल ३,६०,९९० विद्यार्थ्यांनी दिली होती त्यापैकी फक्त ४२० जणांची शेवटच्या यादी मध्ये निवड झाली. राहिलेले ९९.९९% यांच्या पुढे प्रश्न आहे, आता पुढे काय करायचे? त्यांच्या पोट पाण्याचं काय? त्यांच्या घरच्यांचं काय? त्यांचा जो वेळ वाया गेला त्याच काय ? असे अनेक प्रश्न मात्र अनुत्तरित राहतात . त्यामुळे आपण आपला पहिला “A” प्लॅन हा स्वतः पहिल्यांदा स्वतः च्या पायावर उभा राहा आणि मगच “B”प्लॅन म्हणून स्पर्धा परीक्षेकडे पाहावे.कारण उत्पन्न होणार्‍या एकूण नोकरीच्या फक्त४% नोकरी ही सरकारी खात्यात आहे. आणि राहिलेली ९६% नोकरी ही खाजगी क्षेत्रात आहे. 

आणि MPSC यशस्वी होणार्‍या काही मोजक्या लोकांची जशी सोशल मिडीयावर भाषण फिरतात तशी युट्युब वर एखाद स्पर्धा परीक्षांनी लाखो तरुणांचे भविष्य अंधकारमय केलय अस डीमोटिवेटिंग भाषण वायरल झाल पाहिजे. ज्यामुळे या विद्यार्थ्यांना यातून लवकरात लवकर बाहेर पडून काही तरी व्यवसाय,धंदा करता येईल. नोकरी मागणार्या पेक्षा नोकरी देणारे होता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *